श्री क्षेत्र दत्तधाम प्रती गाणगापूर
प्रती गाणगापूर क्षेत्र हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य अश्या तानसा तलावाच्या किनाऱ्यावर आहे. दत्त महाराजांचे सर्वात लाडके शिष्य प.पु.स. रमणनाथजी महाराज यांचे हे स्थान होय. या भूतलावर विश्वकल्याणासाठी तसेच दत्त संप्रदायाच्या प्रसार कार्यासाठी ज्या २४ सिद्ध अनुयायी शक्तींचा अवतार झाला त्यापैकी रमणनाथजी महाराज हे सतरावे अनुयायी होय. या महात्म्याच्या तप सामर्थ्याची दाट वलयं इथे रेंगाळल्याची अनुभूती ह्या भूमीवर पाऊल ठेवता क्षणी येते. अश्या या तपोभूमीत पाऊल टाकल्याबरोबरच मन प्रफुल्लीत होते. मनावरचं काळजीचं, चिंतेचं, निराशेचे, दुःखाचे ओझं कधी गळून पडतं ते समजत सुद्धा नाही, आणि मग मन हलकं हलकं होऊन तरंगावयास लागतं. म्हणूनच ह्या क्षेत्री येणारा प्रत्येकजन हा त्या वलयांच्या फेऱ्यात आल्याबरोबर आपोआप शांत, आनंदी आणि विनम्र होतो.
ह्याच भूमीत प.पु.स.रमणनाथजी महाराजांचे जीवन कार्य अर्थात तपसाधना संपन्न झाले, आणि ह्याच भूमीच्या पोटात इसवी सन १७३५ मध्ये संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी घेतलेली समाधी. ह्या महात्म्याने आपल्या ११० वर्षाच्या साधनेतून मिळालेल्या शक्तीतून जीवब्रम्ह सेवेचे व्रत जन्मभर गिरवल आणि हेच कार्य इतक्या वर्षांनंतरही आजतागायत गुप्त रूपांनी चालू आहे. पूज्य महाराजांच्या ह्या समाधीच्या डाव्या बाजूला कुटीया आहे. या कुटीयाच्या मध्यभागी धुनी आहे, ती चेतन असून दत्तात्रेयांचा तेथे अखंड स्वरूपातील वास आहे. दत्तगुरूमाउलीच्या आशीर्वादाने धुनीतील यज्ञचैतन्याच्या प्रकाशाचा ज्ञान आत्मसात करून हे ज्ञान भक्तांपर्यंत पोहचावे म्हणून याच धुनीजवळ कठोर अशी साधना करून प.पु.स.रमणनाथजी महाराजांनी दत्तगुरूमाउलींची, मेघ देवतेची, गो मातेची अशी अनेक देवतांची पदे रचून त्यांना प्रसन्न केले.
नित्य दिनक्रम
- आसनाची वेळ सकाळी ३ ते ४
- काकड आरती सकाळी ४ ते ४.३०
- नित्य अभिषेक सकाळी ४.३० ते ६
- मूर्तीची आरस सकाळी ६.०० ते ६.४५
- आरती सकाळी ७.००
- दुपारचा नैवेद्य दुपारी ११.४५
- मध्यान आरती दुपारी १२.०० ते १२.३०
- संध्या आरस संध्या. ५.०० ते ६.००
- संध्या आरस संध्या. ५.०० ते ६.००
- हवन संध्या. ७.०० ते ७.४५
- रात्रीचा नैवेद्य रात्री ७.४५ ते ८.००
- आरती रात्री ८.०० ते ८.४५
प.पु.सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्ट
सदर संस्था हि अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून या ट्रस्टचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य हे प.पु. सदगुरू रमणनाथजी महाराजांचे जीवन म्हणजे एक खुले पाठ्यपुस्तक होय या संकल्पनेला धरून महाराजांनी जोपासलेला अध्यात्म मार्ग नजरेसमोर ठेऊन करीत आहे. शिष्य तथा भक्त वर्गास धार्मिक शिक्षण देऊन त्यांच्याकडून अध्यात्मिक सेवा कार्य करून घेते.
प.पु.स. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था
सदर संस्था हि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून सर्व जाती-धर्माच्या मुलांवर अध्यात्मिक संस्कार करण्यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत आहे.दयनीय स्थितीच्या कारणास्तव शिक्षणाचा अभाव असणाऱ्या लोकांमध्ये शिक्षणाची जाणीव करून देऊन अश्या मुलांना, शिक्षणासोबत अन्न, वस्त्र, निवारा, शैक्षणिक साधनसामुग्री, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे.
प.पु.स. रमणनाथजी महाराज
प.पु.स. रमणनाथजी महाराज यांचा जन्म आंध्रप्रदेश प्रांतामध्ये श्रीशैल्यम येथील ज्योतिर्लिंगाजवळ असणाऱ्या निरुपल्ली या गावात झाला होता. रमणनाथजी महाराजांच्या आईचे नाव ‘ऋद्धांगिणी’ व वडिलांचे नाव ‘ऋषिकेश’ होते. रमणनाथजी महाराजांच्या बालवयातच अर्थात ते ८ वर्षाचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे देहांत झाले. तेव्हा ते बालक म्हणजेच रमणनाथजी महाराज जनमानसात विचारणा करीत असत कि, माझे आई-वडील कुठे गेले आहेत ? तर त्यांना एकच उत्तर दिले जायचे कि, ते देवाघरी गेले. हे उत्तर ऐकल्यानंतर तो देव कोण? त्या देवाला काय अधिकार आहे माझ्या आई-वडिलांना माझ्यापासून दूर करण्याचा? त्या देवाला मला भेटायचं आहे आणि हे सर्व विचारायचे आहे. म्हणून रमणनाथजी महाराज बालवयातच देवाच्या शोधात गावोगावी फिरू लागले.फिरता-फिरता कृष्णा नदीच्या काठी (पाताळगंगा) असणाऱ्या शैल्यम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये ते रात्री पोहोचले.
महादेवाने स्वयं साधू रुपात प्रगट होऊन त्यांना हाताला धरून पाताळगंगेच्या किनारी घेऊन आले व आपला हात गंगेच्या उलट्या प्रवाहाकडे दिशा दाखवत रमणनाथजी महाराजांना सांगितले कि, तू ज्या देवाला शोधतोस तो गावा-गावात तुला भेटणार नाही. त्यासाठी तू जंगलात जा! श्री शैल्यम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान महादेवांनी दिलेल्या आदेशानुसार प.पु.स.रमणनाथजी महाराजांनी कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपला प्रवास सुरू केला. कर्दळीवन पार करून रमणनाथजी महाराज कुरवरपूर (कुरगुड्डी) हे श्रीपाद वल्लभ यांच्या स्वयंम तपश्चर्येने पावन झालेली भूमी व आतापर्यंत गुप्त रूपाने संचार करत असणाऱ्या श्रीपाद वल्लभांच्या कृष्णा नदीच्या पंचगंगेच्या मध्यावरील तपोभूमीत पोहोचले. तेव्हा रमणनाथजी महाराजांचे वय हे १२ वर्ष होते. शरीर पायी भ्रमंती करून थकले होते पण देवाला भेटण्याची तळमळ, उत्कंठा एक कणभरही कमी झालेली नव्हती. रमणनाथजी महाराज जिथे श्रीपाद वल्लभांनी ज्या वृक्षाखाली तपश्चर्या केलेली आहे, त्या वृक्षाखाली विश्रांती करावी म्हणून त्या वृक्षाला टेकून बसले. शरीर थकलेले होते. डोळे मिटलेले असताना एक दिव्य स्तंभ रमणनाथजी महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला.
त्या दिव्य स्तंभातील तेज एवढे होते कि, रमणनाथजी महाराजांचे डोळे मिटलेले असतांना सुद्धा ते तेज त्यांना सहन होत नव्हतं. रमणनाथजी महाराजांनी त्यांना विचारले, “ तुम्ही कोण आहात?” तेव्हा दिव्य स्तंभातून उत्तर आले, “तू ज्याला शोधतोस तो मी आहे”. रमणनाथजी महाराजांनी पुन्हा प्रश्न विचारला, “मी कसा विश्वास ठेऊ?” मग समोरून उत्तर आले, “तू कसा विश्वास माझ्यावर ठेवशील?” मग रमणनाथजी महाराज म्हणाले कि, ‘माझ्या आई-वडिलांना माझ्यासमोर आणा मग मी विश्वास ठेवील.’ हे बोलता क्षणी त्या दिव्य स्तंभातून रमणनाथजी महाराजांचे आई-वडील त्यांच्या समोर प्रगट झाले. आई-वडिलांना पाहताक्षणी तो विरह एवढ्या वर्षाचा रमणनाथजी महाराजांना सहन झाला नाही व त्यांनी आई-वडिलांना घट्ट मिठी मारली आणि आई ऋद्धांगिणी यांस प्रश्न केला कि, तू मला का सोडून गेलीस? आईने बालकाच्या मस्तकावर हात फिरवत सांगितले कि, अरे बाळ, आम्ही कुठेही गेलेलो नाही आहोत. तुझे या धरतीवर फार मोठे धर्मकार्य करण्याकरिता आमच्या पोटी तुझा जन्म झालेला आहे. म्हणून तुझ्या या धर्मकार्यात कोणत्याही प्रकारची आमची माया तुला आडवी नको यायला म्हणून स्वयं गुरु दत्तात्रेयांनी त्यांचे चरणी आम्हाला घेतले आहे. फरक फक्त एवढाच आहे कि, आम्ही तुला क्षणोक्षणी पाहू शकतो, फक्त तू आम्हाला पाहू शकत नाही. तू एवढी तपश्चर्या कर कि, तू सुद्धा आम्हाला क्षणोक्षणी पाहू शकशील. तसेच आपल्या तपश्चर्येनी धर्मकार्य करून तुझ्या या जन्माचं सार्थक करून दाखव. मातेच्या मुखातील हे उद्गार ऐकताच रमणनाथजी महाराजांनी सांगितले कि, माते तुझा आदेश माझ्यासाठी सर्वस्वी आहे आणि ती इच्छा मी पूर्ण करणार.
माता रमणनाथजी महाराजांच्या हाताला धरून त्या दिव्य स्तंभाजवळ घेऊन गेली व मातेने प्रार्थना केली कि, “हे दत्तप्रभू, तुमचं दिव्य तेज सामान्य मनुष्यास सहन होत नाही तरी कृपा करून तुम्ही सगुण मूर्तीमध्ये प्रगट व्हा.” दत्तप्रभूंनी हि प्रार्थना स्वीकार करुन त्रिगुणात्मक सगुण मूर्तीमध्ये प्रगट झाले. माता ऋद्धांगिणीने आणि रमणनाथजी महाराज यांनी दत्तप्रभूंना साष्टांग दंडवत केला. मातेने दत्तप्रभूंना विनंती केली कि, हे बालक तुमचं आहे. तुमच्या धर्मकार्याकरिता याचा जन्म झालेला आहे. कृपा करून माझ्या या बालकास तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करून यास अनुग्रह द्या व या बालकाची तपश्चर्येची, धर्मकार्याची सुरुवात करा. दत्तप्रभूंनी स्मित हास्य करून रमणनाथजी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून रमणनाथजी महाराजांच्या मागील सोळा जन्माची तपश्चर्या जागृत करून त्यांना कृपाआशीर्वाद देऊन अनुग्रह दिला तसेच सिद्ध पादुका दिल्या आणि त्यांना कृष्णेच्या पुढील प्रवाहतीरी वसलेल्या नरसोबावाडी येथे बारा वर्षे व औदुंबर वाडी येथे सहा वर्षे तप करण्यास सांगितले. औदुंबर वाडी येथील सहा वर्षे तप पूर्ण झाल्यानंतर दत्त महाराज पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी प.पु.स.रमणनाथजी महाराजांना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या भोगावती नदीच्या तिरी जाऊन तप तथा आपले आश्रम स्थापित करून धर्मकार्य करण्याचा आदेश दिला.
प.पु.स.रमणनाथजी महाराजांनी भोगावती नदीच्या किनारी ११० वर्षे हटयोगाने तपश्चर्या केली. याच कालखंडात प.पु.स.रमणनाथजी महाराजांनी दत्त महाराजांच्या आदेशानुसार काशी तीर्थ यात्रा सुद्धा केली आणि भगवान दत्तात्रेयांनी स्थापन केलेल्या दत्त गादीचा वारसा ११० वर्षे चालविला. आणि भगवान दत्त महाराजांनी दिलेल्या आदेशानुसार याच भूमीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संजीवन समाधी घेऊन शरीर स्वरूपातील आपल्या अवतार कार्यास पूर्णविराम देऊन आत्मस्वरुपातील विश्व कार्यास प्रारंभ केला. प.पु.स. रमणनाथजी महाराजांची ही संजीवन समाधी तानसा या गावांमधील भोगावती नदीच्या तीरी असणाऱ्या भोगावती नगर अर्थात ज्यास प्रति गाणगापूर म्हणून संबोधिले जाते येथे आहे. येथे आजही हजारो भक्तगण दर्शनाकरिता येतात व प.पु.स. रमणनाथजी महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करतात
प.पु.स. रमणनाथजी महाराज परिवार
गुरु आपले दर्पण गुरु करी परीक्षण | गुरु करावे स्मरण, गुरु देव तो स्मरण ||
गुरु करुणाकर , गुरु परम ईश्वर | गुरु देती आधार , गुरु एक शिल्पकार ||
रमणनाथजी महाराज परिवार हा भगवान दत्तात्रेय प्रणीत नाथ संप्रदायी. भक्तवत्सल्य त्रिगुणातील भगवान श्री दत्तात्रेय हेच या परिवाराचे परम दैवत. या परिवाराला सुरुवातीच्या काळात प.पु.स. रमणनाथजी महाराजांनी ज्ञानामृत पाजून मोठे केले म्हणजेच खर तर हे साधू धर्माचे बीज पेरले ते प.पु.स. रमणनाथजी महाराजांनी. इसवी सन १७३५ म्हणजे सुमारे २८५ वर्षापूर्वीच त्या काळात असलेल्या निर्विड अरण्यातल्या एका टेकडीवर असलेली प.पु.स. रमणनाथजी महाराजांची संजीवन समाधी हेच ह्या परिवाराचे श्रद्धास्थान. या परिवाराला खत पाणी घालून सिद्धज्ञानाने रुजवले ते प.पु.स. भागवत बाबांनी. वृक्ष जसा फुलतो, फळतो, मोठा होतो तद्वत हा परिवारही मोठा होत गेला. प.पु.स भागवत बाबा हे रमणनाथजी महाराजांच्या गादीवरचे पहिले महंत होत. या प्रति गाणगापूर क्षेत्री रमणनाथजी महाराजांचं स्थान आहे, समाधी आहे हे माहित झालं ते प.पु.स. भागवत बाबांमुळेच, या स्थानाला रंगरूप देण्याच कार्य खऱ्या अर्थाने केलं ते प.पु.स. भागवत बाबांनी.
प.पु.स. रमणनाथजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने, आशीर्वादाने संसारी जनांची पिडा, दुःख दूर करण्यासाठी पूज्य भागवत बाबांनी जीवब्रम्ह सेवेचं असीधारा व्रत स्थानावर आचरले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी दिनांक १९/०२/१९९३, शुक्रवार रोजी समाधी घेतली. या सत्पुरुषाच्या पश्चात त्यांच्या पावलावर पावुल ठेऊन या परिवाराची घोडदौड अखंड पुढे नेले ते त्यांचे सतशिष्य भक्तवत्सल, प्रेमळ माउली, गादिवरचे दुसरे महंत प.पु.स. दुर्गानाथ महाराजांनी. जिथे दिवसाही माणसं येण्यास भीत असत अश्या निबीड अरण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळ प्रसंगी झाडाची पाने खावून ह्या स्थानावर स्थिर राहिले, कठोर साधना केली आणि गादिवरचे दुसरे महंत म्हणून ह्या पदावर आरूढ झाले. .
अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले प.पु.स. दुर्गानाथ महाराजांनी आश्रमाच्या उभारणीसाठी खूप मेहनत घेतली आणि आपलं जीवन ह्या जीव-ब्रह्मसेवेच्या कार्यासाठी समर्पित केल. परमेश्वरी कार्य पार पाडून गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर दिनांक ११/०८/२०२०, मंगळवार रोजी दत्त स्वरुपात विलीन होवून देह विसावला. प्रभू दत्तात्रेय आणि प.पु.स. रमणनाथजी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने तानसा गावात दिनांक २५/०४/१९८९ रोजी दिव्य बालक जन्मले ते म्हणजे प.पु.स. अलोकनाथजी महाराज. प.पु.स. दुर्गानाथ महाराजांच्या पश्चात स्थानाची धुरा सांभाळतात ते प.पु.स.अलोकनाथजी महाराज. बालपणापासूनच प.पु.स. दुर्गानाथजी महाराजांच्या भक्ती तसेच शक्ती मार्गदर्शनाखाली फुललेले अनमोल पुष्प अर्थात प.पु.स. अलोकनाथजी महाराज हे मूळतः बालब्रह्मचारी, कनवाळू, कष्टाळू, मायाळू, धाडसी, स्वाभिमानी, परोपकारी तसेच कर्तुत्व, दातृत्व, व नेतृत्वाने ओतप्रोत परिपूर्ण असलेले ह्या पावनपवित्र स्थानाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाने सद्यस्थितीत या पावन भूमीवर प.पु.स.रमणनाथजी महाराज समाधी देवस्थान ट्रस्टचे ऑफिस व आश्रम उभे आहे. या ट्रस्टचे व सर्व भक्त परिवाराचे संचालन अध्यक्ष व मठाधिपती, महंत अर्थात महान सिद्ध योगी प.पु.स.अलोकनाथजी महाराज करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून या स्थानावर आता गोशाळा उभी राहिली. केवळ अध्यक्ष किंवा मठाधिपती म्हणवून न घेता तेहतीस कोटी देवांचे स्थान आणि दत्तप्रभूंचे गुरु म्हणून गो मातेची सेवा प.पु.स.आलोकनाथ महाराजांच्या व्यवस्थापनाखाली केली जाते. तसेच केवळ पालन पोषण आणि संवर्धन हाच हेतू न ठेवता तेहतीस कोटी देवांची सेवा हा शुद्ध, निर्मळ आणि पवित्र हेतू आहे म्हणून इथे येणारा भक्त स्वइच्छेने येथील गोमातेच्या चाऱ्यासाठी देणगी स्वरूपातून सेवा देऊ शकतो
रमणनाथजी महाराज परिवाराची शिकवण
- या परिवाराची खरी शिकवण हि मानसपुजेची. आत्मा आणि परमात्मा हे नात आई-मुलाचं.
- परमात्मा एकच आहे पण या भूमीवर त्याने अनेक रूपांनी, अनेक गुणांनी अवतार घेतलाय. त्या विविध रूपातल्या भगवंताची सेवा करा. त्यातून मिळणारे ज्ञान आणि शक्ती तुमचे जीवन आमुलाग्र बदलून टाकेल.
- जीवांच्या वाटेवरून चालताना अनेक दीन, दुबळे, पिडीत, आपल्या सान्निध्यात येतात; त्यांना सहाय्य करणे, त्यांच्या दु:खावर फुंकर घालणे हे आपलं कर्तव्य आहे.
- उठता-बसता, खाता-पिता सद्गुरूंचे स्मरण हीच खरी सिद्धत्वाची जागृती. सिध्दत्वचा मार्ग हा अंतरंगाचा आहे.
- “ ॐ सोहम ब्रह्मंम” चा जप अखंड हृदयात जपून हृदयाचे मंदिर करा.
- भगवंताचा जप करताना कुठलाही हेतू मनात न ठेवता, लोभाला बळी न पडता, मोहात न फसता फक्त भक्तीने अखंड स्मरण करून भक्तीचा पाया भरा.
- शरीर हे भगवंताचे घर आहे तेव्हा हे घर शुद्ध ठेवा. अष्टांग भस्म धारण करा . आचार विचार शुद्ध करा. सद्गुरुनी दाखविलेल्या मार्गावरून दृढ निश्चयाने चाला
- गुरूंनी दिलेले ज्ञान नुसतं ऐकून सोडून देऊ नका. तर स्मरणात ठेवा आणि अंमलात आणा. हृदयाचे मंदिर करा आणि त्यात सद्गुंना थारा द्या, त्यांचे बोल ऐका, त्यांच्या शिकवणीवर प्रेम करा व त्याप्रमाणे चाला.
- सिद्धत्वाच्या मार्गावर, मन बुद्धीची चाकं लावा पण रथ मात्र शरीराचा करायचा नाही तर ध्येय धोरणाचा करा आणि आत्म्याला सारथी बनवा. अर्थात शरीर आणि मनाला आत्म्याच्या स्वाधीन करा.
- गुरूंची व आई वडिलांची आज्ञा पाळा.
- साधू संतांची निंदा करू नये. आत्मा हाच परमात्मा जाणावा.
- सत्य धर्माचे पालन करावे. खरे बोलावे. खोटे बोलू नये.
- दुधाचे व उसनवार पैसे बुडवू नये.
- परस्त्री मातेसमान मानवी.
- पाणी चोरू नये. दुसऱ्याची तहान प्रथम भागवावी.
- अतिथीस परमेश्वरासमान मान द्यावा.
- मादक पदार्थाचे सेवन करू नये. मांस भक्षण करू नये.
- गाईला मारू नये. तिची चुगली करू नये
- अन्न देवतेचा अपमान करू नये.
- जंगलाला आग लाऊ नये.
- पायाने अग्नी विझऊ नये.
- वड, उंबर, कडुलिंब या झाडांवर गुरु आज्ञेशिवाय चढू नये.
प.पु.स. रमणनाथजी महाराजांची आरती अर्थात एकविशी
प.पु.स. रमणनाथजी महाराजांची आरती अर्थात एकविशी बोलून अनेक भक्तगणांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन जीवन प्रकाशमय झाले आहे. ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन, घरातील वातावरण मंगलमय होते व घरात सुख – शांती – समाधान नांदते. ह्या एकविशीचे पठण ब्रह्ममुहूर्तावर अंतर आत्म्यातून करून अनेकांना त्याची प्रचिती आलेली आहे. अशी हि एकविशी पिशाच्च बाधा झालेल्या, आधी- व्याधीने ग्रस्त झालेल्या भक्तांसाठी जणू काही दिव्य संजीवनी आहे. सर्व मनोकामना अर्थात इच्छिलेले पूर्ण करणारी कल्पतरूच जणू. दत्त बावन्नी प्रमाणेच रमणनाथजी बाबांची हि एकविशी म्हणजे “लाख दुःखो की एक दवा” आहे. एकविशीच्या नित्य पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःख दूर होतात.